Success story-Soybean Farming- छोट्या बचतीतून यशाचा मार्ग
सोलापूर जिल्ह्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील रवींद्र एकनाथ मोरे यांच्याकडे १०.५ एकर शेती असून ती थोपटेवाडी शिवारात आहे. त्यांच्या दोन मुलांनी, सागर आणि सूरज, शेतीत उतरून संपूर्ण शेतीचा भार पेलला आहे. या शेतीत मुख्यत्वे ऊस, गहू, खपली गहू आणि सोयाबीन अशी पिके घेतली जातात. ऊस हे नगदी पीक वर्षा-दिड वर्षातून एकदाच उत्पन्न देते.
ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत त्यांनी ऊस शेतीसोबत सोयाबीनसारख्या आंतरपिकाचा प्रयोग केला. टोकण पद्धतीने लागवड केल्यामुळे एका एकरासाठी साडेतीन किलो बियाणे लागले. फक्त वीस हजार रुपयांच्या खर्चात १८ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. याच यशामुळे त्यांनी सलग दोन एकर क्षेत्रावर सोयाबीनची टोकण लागवड यशस्वीपणे केली.
लागवडीचे नियोजन
सोयाबीन लागवडीसाठी सेंद्रिय खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी घरच्या घरी १ टन गांडूळ खत तयार केले. त्यामुळे बाहेरून खते विकत घेण्याचा खर्च टाळता आला.
- जमिनीत नांगरट केल्यानंतर साडेतीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले.
- गादीवाफ्यावर १ टन गांडूळ खत, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १ किलो ट्रायकोडर्मा, आणि २ किलो रायझोबिअम जिवाणू संवर्धक यांचे मिश्रण वापरले.
- ठिबक सिंचनाच्या लॅटरल्स जमिनीवर अंथरल्या.
- रासायनिक बीजप्रक्रिया करून नंतर नऊ इंच अंतरावर तीन ओळींमध्ये टोकण पद्धतीने बियांची लागवड केली.
- लागवडीनंतर लगेच तणनाशकाची फवारणी केली.
खत व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी आणि पिकाच्या टप्प्यांनुसार काटेकोरपणे खत व्यवस्थापन केले गेले.
- लागवडीनंतर ५ दिवसांच्या अंतराने दोनदा १९-१९-१९ खतांची २ किलो प्रति एकर मात्रा दिली.
- फुलकळीच्या अवस्थेत पालाश खतांसाठी १३-४०-१३ आणि १३-०-४५ खतांची प्रति एकर ३ किलो मात्रा दिली.
- शेंगा लागणीच्या अवस्थेत ०-५२-३४ खतांची २ वेळा मात्रा दिली.
- शेंगा पक्वतेच्या अवस्थेत ०-०-५० खतांची ४ किलो मात्रा दिली.
खत व्यवस्थापनासाठी एकरी १२ हजार रुपये खर्च आला. वेळच्या वेळी योग्य खत दिल्यामुळे उत्पादन वाढले.
कीड आणि रोग व्यवस्थापन
लागवडीनंतर १९-१९-१९ खतांची २ किलो प्रति एकर प्रमाणे पाच दिवसांच्या अंतराने दोन वेळा दिले.
यानंतर १२ -६१-० या विद्राव्य खताची दोन किलो प्रति एकर प्रमाणे रोटेशन पद्धतीने दिले.
फुलकळीच्या पिकाची पालाश खतांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या अवस्थेत १३-४०-१३, १३-०-४५ या खतांची प्रति एकरी ३ किलो या प्रमाणे मात्रा दिली.
यानंतर शेंगा लागणीच्या अवस्थेत ०- ५२ -३४ या खतांची ४-५ दिवसांच्या अंतराने २ वेळा मात्रा दिली.
शेंगा पक्वतेच्या अवस्थेत ०-०-५० एकरी ४ किलो या प्रमाणे एकदाच मात्रा दिली.
अत्यंत काटेकोरपणे व वेळच्या वेळी केलेल्या या खत व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ मिळण्यास मदत झाली. यासाठी १२ हजार रुपये प्रति एकरी खर्च आला.
हंगामात केवळ तीनच फवारण्या
दरम्यानच्या काळात २०, ३५ आणि ६० व्या दिवसांच्या टप्प्यांमध्ये कीडनाशक आणि पोषक घटकांची फवारणी केली. संपूर्ण हंगामात तीन फवारण्या करण्यात आल्या. यामध्ये ३५ व्या दिवशी म्हणजेच फुलकळी लागण्याच्या अवस्थेतील महत्त्वाची फवारणी होती. तर शेवटची फवारणी ड्रोनद्वारे केल्यामुळे चालताना होणारे झाडांचे व शेंगाचे नुकसान कमी झाले. त्याचा फायदा उत्पादनासाठी मिळाल्याचे मोरे सांगतात. फवारणीसाठी सहा हजार रुपये प्रति एकर इतका खर्च झाला.
सर्वाधिक शेंगाची संख्या
सामान्यतः सोयाबीन झाडावर सरासरी १५० ते १७५ शेंगा लागतात. मात्र उत्तम व्यवस्थापनामुळे मोरे यांना प्रति झाड २५० पेक्षा अधिक (सर्वाधिक ३०० ते ३२५) शेंगा मिळाल्या.
आघारकर संशोधन संस्थेचे मार्गदर्शन
सागर यांचे मित्र श्रीकांत गायकवाड आणि आघारकर संशोधन संस्थेच्या बारामती कार्यालयातील संशोधकांनी विविध पिकामध्ये मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे मोरे यांनी सांगितले. मोरे यांनी गेल्या वर्षी ठिबक सिंचनावर गव्हाची लागवड केली होती. त्यातही एकरी पंधरा रुपये उत्पादनखर्चामध्ये एकरी ३० क्विंटल गहू उत्पादन घेतले होते. त्याला दर ३० रुपये प्रति किलो मिळाला. या हंगामात ठिबक सिंचनावर खपली गव्हाची लागवड केली आहे.
वर्षभरात ऊस ३५० टन धरला तरी ८ ते १० लाख रु. आणि अन्य हंगामी पिकातून चार ते पाच इतके लाख रु. मिळतात.
या उत्पन्नातून वडील रविंद्र, आई सौ. शशिकला, काकी राधिका, सागर, त्यांची पत्नी सौ. कोमल, सूरज, त्यांची पत्नी सौ. प्रिया व एकूण सहा मुले असे साधारण १३ माणसांचे एकत्रित कुटुंब आहे. या सर्व कुटुंबाचा एकत्रित खर्च सहा ते सात लाख रु. होतो.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च एक ते सव्वा लाख रुपये होतो
दरवर्षी शिल्लक उत्पन्नापैकी पुढील वर्षाच्या पिकांचा खर्च वगळून शिल्लक रकमेपैकी काही हिस्सा हा बॅंकेच्या मुदत ठेवीमध्ये ठेवला जातो. आजोबापासून अशा शिल्लक ठेवी व बचतीमधूनच फलटण तालुक्यात ताथवडा गावी २२ एकर शेती २०११ मध्ये खरेदी करता आली.
आजोबा कै. एकनाथअप्पा यांच्या मते, शेतीतील गुंतवणूक कधीच वाया जात नाही. त्यामुळे आम्ही कुटुंबीयांनी जास्तीत जास्त शेती खरेदी करणे व विकसित करणे याचेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.
वडील रवींद्र मोरे आजही सांगतात, की आम्ही खिशात एखादी भाकरी घेऊन शेतात राबत आलो. आता तुम्हा मुलांसाठी शेतीमध्ये सर्व सुविधा करून दिल्या आहेत. त्याने कष्ट कमी झाले असले, तरी शेताकडेच आपले सारे लक्ष असू द्या. कोणतेही पीक अयशस्वी झाले किंवा दर मिळाला नाही, तर नाराज होऊ नका. मुलांनो, आपल्या काळ्या आईची ओटी भरली असे समजा आणि जोमाने कामाला लागा. या वावराला देव माना. पाया पडूनच शेतात शिरा. मग तो पावल्याशिवाय राहणार नाही. ओंजळभर पाऊस दिला, तर कवळाभर पीक काढू. मातीत अंकुर निघाला, तर कुबेरालाही भीक वाढू!
असे आहे अर्थकारण
साध्या पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन पिकात एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळते. उसामध्ये घेतलेल्या आंतरपिकात उसाची मुबलक खते आणि पाणी यामुळे मोरे यांना १८ क्विंटल उत्पादन मिळाले. या वर्षी सलग सोयाबीनचे २२ क्विंटल उत्पादन घेण्यात यश आले आहे. टोकण पद्धतीमुळे बियांचा, खतांचा आणि फवारण्यांचा खर्च बऱ्यापैकी वाचला.
सलग केलेल्या सोयाबीन लागवडीमध्ये खते व फवारणीच्या खर्चात थोडी वाढ झाली तरी घरीच तयार केलेल्या गांडूळ खताचा वापर केला. त्यामुळे एकरी ४ क्विंटलने उत्पादन वाढविण्यात मोरे यांनी यश आले. या पद्धतीत त्यांना एकरी २२ हजार रुपये खर्च आला, तर ८० हजार रु. निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
– सूरज रवींद्र मोरे, ९८२३९४९४९३