यशोगाथा

Dairy Processing Industry : यांत्रिकीकरणातून विस्तारला दुग्धप्रक्रिया उद्योग

Dairy Sector Development : माणिक रासवेपरभणी येथे स्थायिक झालेले पंकज गणेशराव रुद्रवार यांनी बी ई. मेकॅनिकल ही पदवी संपादन केली.त्यानंतर एक वर्षभर पुणे येथे कंपनीमध्ये नोकरी केली. परंतु तिथे मन रमले नाही. आर्थिकदृष्ट्याही ते समाधानी नव्हते. सन १०१७ च्या सुमारास ते परभणीला परतले. त्यांचे मूळगाव जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) आहे. तेथे कुटुंबाची सुमारे १० एकर शेती होती. मात्र ती विकून परभणी परिसरात पाच एकर शेती त्यांनी विकत घेतली.

त्यात नैसर्गिक पद्धतीने तीन ते चार एकरांतत्यांनी हळद लागवड केली. त्यापासून पावडर निर्मिती तसेच विशिष्ट स्वादाचे लोणचे तयार करून विक्री सुरू केली. पुढे जवळा बाजार येथील यशस्वी दुग्ध प्रक्रिया उद्योजक भगवान सावंत यांच्याकडूनदुग्ध प्रक्रिया उद्योगातील संधी त्यांनी जाणून घेतल्या. त्यांच्याच प्रेरणेतून परभणी शहरात दुग्धप्रक्रिया उद्योग सुरू केला. , काही महिने सावंत यांच्याकडून पनीर, दही, खवा ही उत्पादने खरेदी करून शहरात विक्री केली. त्यातून ‘मार्केट’मध्ये ओळखी वाढल्या. ग्राहकांचे जाळे तयार झाले. सोबतीला यशस्वी उद्योजकांचे अनुभव जाणून घेणे सुरू होतेच.

आधुनिकीकरण

दुग्धप्रक्रिया उद्योगात दीर्घकाळ काम करायचे असेल व उलाढाल वाढवायची असेल तर पदार्थांची श्रेणी वाढवणे व आधुनिकीकरण व यांत्रिकीकरणाला पर्याय नाही हे पंकज यांनी जाणले. त्यानुसार हालचाली सुरू केल्या. आज सुमारे २०१८ च्या काळानंतर ते आतापर्यंतच्या सुमारे सहा वर्षांच्या वाटचालीत विविध यंत्रांमध्ये मिळून ५० ते ६० लाख रुपयांची गुंतवणूक केली, त्यासाठीघरचे भांडवल, बॅक कर्ज यांचा उपयोग केला. परभणी येथील शासकीय औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) येथे भाडेतत्त्वावर जागा घेतली आहे. सध्या पाश्चरायझेशन सयंत्र, बल्क कुलर, स्टीम बॉयलर, पाऊच पॅकिंग यंत्र, शीतगृह, इनक्युबेटर आदी यंत्रसामग्री आहे.

सुमारे अर्ध्या तासात प्रति २० लिटर दुधापासून पाच किलो खवा तयार करण्याची यंत्राची क्षमता आहे. पूर्वीच्या गॅसचलित यंत्रावरील खवानिर्मितीची गरज आता संपूनआधुनिक पद्धत स्वस्त पडत आहे. पाश्‍चरायझेशन यंत्राची एकहजार लिटर प्रति तास अशी प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. तर एक हजार लिटर दुधापासून साडेतीन तासात दही तयार करण्याची संबंधित यंत्राची क्षमता आहे. अर्थात, दूध उपलब्धतेनुसार ही क्षमता वापरण्यात येते. दुधावर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्यातील सर्व घटकांचे शास्त्रीय पृथक्करण केले जाते. त्यासाठी आवश्‍यक प्रयोगशाळाही उभारली आहे.

त्रिधारा ब्रॅण्डची उत्पादने

पंकज पाच दूध संकलन व्यावसायिकांकडून दूध खरेदी करतात. हे दूध परभणी तसेच वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांकडील असते. या व्यावसायिकांकडील दुधाला फॅट, एसएनएफ प्रमाणानुसार प्रति लिटरचा दर दिला जातो. प्रतिदिन १२०० ते १४०० लिटर दूध खरेदी वा संकलन होते. हंगामी काळात हे संकलन दोनहजार लिटर संकलनापर्यंत पोहोचते. बहुतांश सर्व दूध प्रक्रियेसाठीच वापरले जाते.

त्रिधारा नावाने ब्रॅण्डचे नोंदणीकरण केले आहे. दुधाची उपलब्धता, ग्राहकांची गरज, सण- समारंभ व हंगाम आदींचा विचार करून ऑर्डरनुसार म्हशीचे फूल क्रीम मिल्क, गायीचे टोन्ड मिल्क, दही, खवा, पनीर, पेढे, तूप, लस्सी आदी विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. ग्राहकांच्या गरजेनुसार वजनी पॅकिंग उपलब्ध केले आहे. एखादे उत्पादन अतिरिक्त झाल्यास उणे २२ अंश तापमानाला शीतगृहात काही उत्पादने ठेवण्याची सोय केली आहे. आइस्क्रीम व्यावसायिकांना क्रीमचा पुरवठा केला जातो.

पेढ्याला विशेष पसंती

इथला खवा व पेढा विशेष प्रसिद्ध आहे. प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे तर प्रतिदिन ७० किलो खवा, तर ७ ते ८ किलो पेढे तयार केले जातात. खव्यामध्ये विशिष्ट प्रमाणात साखर, वेलची यांचा वापर करून ‘क्युब्ज’ आकाराचे पेढे कमी वेळेत तयार होतात. खव्याचे रिटेल दर प्रति किलो २६० रुपये आहेत. त्याची घाऊक विक्री होत असली तरी पेढे स्वतःच्या आउटलेटवरून रिटेल दराने विकले जातात.

विक्रीची केंद्रे

उत्पादनांच्या विक्रीसाठी परभणी शहरात दोन ठिकाणी ‘आउटलेट्‍स’ सुरू केली आहेत. त्याची जबाबदारी स्वतः पंकज पाहतात. नांदेड येथे आउटलेट सुरू केले असून, मेहुण्यांकडे ती जबाबदारी दिली आहे. या शिवाय जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, वसमत या तालुक्यांच्या ठिकाणी काही व्यावसायिकांकडून उत्पादनांची खरेदी होते. परभणी शहरात उत्पादनांच्या वाहतुकीसाठी स्वतःचे वाहन आहे.

दोन कोटींपर्यंत उलाढाल

पंकज यांना उद्योगात वडील गणेशराव, आई प्रणिता, पत्नी ज्योती, मेहुणे श्रीनिवास व प्रवीण बंडेवार यांची भक्कम साथ मिळते. त्यांच्या पाठबळावरच उद्योगाचा विस्तार करणे त्यांना शक्य झाले असून पुढील वाटचाल सुरू आहे. या उद्योगातून चार व्यक्तींना रोजगार दिला आहे. सुरुवातीच्या काळात ५० ते ६० लिटर दूध संकलनापासून उद्योगाची सुरुवात केली होती. आज १४०० ते दोन हजार लिटरपर्यंत रोजचे दूध संकलन तर वर्षाला दोन कोटी रुपयांची उलाढाल असा प्रगतीचा चढता आलेख आहे.

रुद्रावार यांच्या उद्योगाची वैशिष्ट्ये

पंकज यांनी मेहुण्यांना सोबत घेऊन दोन लाख रुपये भांडवलावर उद्योग सुरू केला होता. घरचे व नातलग मंडळना सहभागी करून प्रत्येकाकडे कामांची विभागणी केली. त्यातून व्यवस्थापन सुकर, सोपे झाले. कामांचा ताण कमी झाला.

प्रक्रियेमुळे उत्पादनांचे मूल्यवर्धन होऊन उद्योगातील नफा वाढला.

स्वतः आउटलेट उभारल्याने थेट विक्री करणे शक्य झाले.

उत्पादनांच्या पारंपरिक यंत्रसामग्रीपेक्षा अधिक क्षमतेच्या यंत्रांचा वापर केल्याने कमी वेळेत, कमी मजुरांमध्ये उत्पादनांची निर्मिती होऊ लागली.

पंकज रुद्रवार ९०२८३९५९६७