Farming

Ratnagiri Hapus Mango : रत्नागिरी हापुसच्या पेटीला २५ हजारांचा दर

Ratnagiri News : रत्नागिरी हापूसची पहिली पेटी पाठविण्याचा मान चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी आणि पावस महातवाडी येथे राहणारे शकील उमर हरचिरकर यांनी मिळवला आहे. हरचिरकर यांच्या दोन पेट्या मुंबईत वाशी मार्केटला, तर बंदरी यांच्या सहा डझनच्या दोन पेट्या अहमदाबाद मार्केटमध्ये पोहोचल्या आहेत. अहमदाबाद येथे दोन पेटी हापूस आंब्याला २५ हजार रूपये दर मिळाला आहे.

पावस महातवाडी येथे राहणारे शकील उमर हरचिरकर यांच्या गोळप धनगरवाडी येथील हापूस आंब्याच्या बागेतील हे आंबे आहेत. पेटी लवकर पाठवण्याचे हे त्यांचे चौथे वर्ष आहे. गोळप धनगरवाडी येथे एक एकरमध्ये हापूस आंब्याची ४० झाडे आहेत. गेली चार ते पाच वर्षे या बागेचे स्वतः योग्य नियोजन करून हापूस आंब्याची काढणी करतात. भर पावसात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात आलेला मोहर टिकवण्यासाठी तीन ते चार फवारण्या केल्या. बागेचे योग्य जतन करत १६ जानेवारीला दहा डझन आंबा काढला.

आंब्याच्या दोन पेट्या मुंबई वाशी मार्केटमधील शैलेश नलावडे यांच्याकडे विक्रीसाठी पाठवल्या. शुक्रवारी त्या वाशी बाजारात पोहोचल्या आहेत. पहिल्या हापूसच्या पेटीची पूजा श्री. नलावडे यांनी केली. त्याचा लिलावही करण्यात येणार आहे. सलग चौथ्या वर्षी हापूस आंब्यांची पेटी लवकर पाठवण्याचा मान शकील यांनी मिळवला आहे. येत्या काही दिवसांत आणखी पेट्या बाजारात पाठवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी यांच्या बागेतील एका कलमावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोहर पाहायला मिळाला. त्या वेळी मुसळधार पावसाने सुरू होता. मात्र त्याही परिस्थितीत मोहर वाचविण्यासाठी बंदरी यांनी आठ दिवसांनी फवारणी करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे मोहर वाचला आणि ऑक्टोबर अखेरीस फळधारणा सुरू झाली. पुढे आंबा तयार होईपर्यंत विशेष लक्ष ठेवले. गुरुवारी (ता. १६) काढणी करून आंबा अहमदाबाद मार्केटला पाठविला. गेल्या वेळी २९ जानेवारी सहा डझनच्या दोन पेट्या अहमदाबाद मार्केटला पाठवल्या आहेत. बागेतील फक्त एकाच झाडाला आंबे लागलेले होते. अहमदाबाद मार्केटमध्ये झालेल्या लिलावात त्याला २५ हजार रूपये दर मिळाला आहे.

यंदा दोन पेटी आंबा बाजारात पाठविला आहे. विशेष लक्ष देऊन चांगल्यात चांगले फळ बाजारात पाठवून चांगला दर मिळवण्याचा हेतू आहे. २०१७ रोजी जानेवारी महिन्यात आंबा पाठविला होता. मागील दोन वर्षे लवकर आंबा बाजारात गेला. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. पावस येथील बागेत सेंद्रिय पद्धतीने झाडांचे संगोपन केले आहे. -शकिल हरचिरकर, पावस

सप्टेंबर महिन्यात सलग आठ दिवस कडकडीत ऊन पडले होते. त्यामुळे झाडाच्या मुळांना ताण बसला. तसेच त्या झाडाची पान पाहिल्यावर मोहर लवकर येईल असा अंदाज बांधलेला होता. त्यानुसार पुढे नियोजन केले. पहिली पेटी अहमदाबाद येथील मार्केटला पाठविली आहे. २००६ पासून आंबा तिकडे पाठवत असल्यामुळे हा निर्णय घेतला. -रेहान जब्बार बंदरी, चांदराई