यशोगाथा

Farmer success story-बटण अळिंबी शेती: युवा उद्योजकांसाठी लाभदायक व्यवसाय

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शिवारात सुमारे १०० एकरांवर निलावार कुटुंबाची कापूस लागवड होते. उत्पादित कापसावर घरच्या जिनींगमध्येच प्रक्रिया करण्यावर भर दिला जातो. येथील जिनींग व्यवसायात अशोक निलावार व दिलीप चिंतावार हे भागीदार आहेत. या दोघांची मुले निखिल निलावार व अभिनव चिंतावर. दोघांचेही शिक्षण बी. ई सिव्हिल (इंजिनिअरिंग) पर्यंत झाले आहे.वडिलांप्रमाणेच आपणही व्यावसायिक भागीदारीतून शेतीपूरक व्यवसाय उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कुटुंबाप्रमाणेच स्पिनींग व्यवसाय सुरू करण्याचा निखिल व अभिनव यांचा विचार होता. या उद्योगाकरिता केंद्र सरकारचे अनुदानही होते. परंतु दरम्यानच्या काळात हे अनुदान बंद करण्यात आले. या सर्व घडामोडीत विविध प्रकारच्या कच्च्या मालाचा वापर अळिंबी उद्योगात होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अळिंबी उद्योगामध्ये काहीतरी करण्याविषयी दोघांचे एकमत झाले.

२०१५ च्या अखेरीस अळिंबी उद्योग करण्याचे अंतिम झाले. या व्यवसायात सद्यःस्थितीत असलेल्या उद्योगाची माहिती घेण्यास सुरवात केली. मात्र काही उद्योजकांनी अनुदानापुरतेच उद्योग सुरू केल्याचे आढळले. त्यामुळे अळिंबी उत्पादन करणारे मोठे उद्योग दिसून आले नाहीत. त्यातही सुरू होऊन बंद झालेले तब्बल ९९ टक्‍के उद्योग होते. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, हरियाना, दिल्ली या राज्यातील चालू उद्योगांना दोघांनी भेटी दिल्या. तब्बल २५ ते २६ उद्योगांची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यांमधून या व्यवसायाशी निगडित बारकावे, जोखीम तसेच बाजारपेठ व मिळणारा दर याबाबत जाणून घेतले. एवढ्यावरच न थांबता हिमाचलमधील सोलन येथे १० दिवसांचे प्रशिक्षण घेतले. थोडक्‍यात अळिंबी उद्योगाची तोंडओळख या ठिकाणी झाली, असे निखिल सांगतात.

व्यवसायासाठी पूरक जागेची निवड

उद्योग उभारणीकरिता पुरेशी आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोयीची मुख्य रस्त्यानजीकची जागा आवश्‍यक होती. अशा जागेचा शोध सुरू केला. नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील कानकाटी (ता. समुद्रपूर, जि. वर्धा) येथे राष्ट्रीय महामार्गावरील जागा सर्व सोयींचा विचार करून निश्‍चित करण्यात आली. हा रस्ता चारपदरी असल्याने अंतर जास्त असले, तरी वाहतुकीचा वेळ कमी होता. सोबतच संसाधनाची उपलब्धता व्हावी याकरिता देखील जागा उपयोगी ठरावी, असा निकष होता. त्यानुसार वीज उपकेंद्रानजीक जागा निवडण्यात आली. त्यामुळे विजेसह इतर संसाधनाची उपलब्धता होण्यास अडचणी आल्या नाहीत, असे निखिल सांगतात.

असा विस्तारला उद्योग

२०१७ मध्ये प्रकल्पाकरिता सात एकर जागा खरेदी केली. दरम्यानच्या काळात विविध अळिंबी उत्पादन प्रकल्पांना भेटी सुरुच होत्या. अखेर प्रकल्प आराखडा तयार करून २०१९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात अर्धा एकरावर शेडची उभारणी केली. शेडच्या आतील भिंती ‘पफ पॅनल’ पासून उभारण्यात आल्या असून इन्शुलेशनचे काम याद्वारे होते. अळिंबी उत्पादनाकरिता आवश्यक आर्द्रता, तापमान, वायुवीजन या घटकांच्या पॅरामीटरनुसार नियंत्रित ठेवावे लागते. याद्वारे ते शक्‍य होते, असे निखिल सांगतात.

अळिंबी निर्मितीसाठी आवश्यक कंपोस्ट तयार करण्यासाठी दहा हजार चौरस फुटांचे स्वतंत्र शेड उभारले आहे. अळिंबीच्या बिया टाकण्यासाठी सुमारे सहा हजार चौरस फुटांचे शेड उभारले आहे. अशाप्रकारे विविध कामांसाठी स्वतंत्र शेडची उभारणी करण्यात आली आहे. त्यावर एकत्रितपणे सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. भांडवल उभारणी काही घरून, तर काही बॅंकेकडून कर्ज स्वरूपात घेऊन करण्यात आली आहे, असे ते सांगतात.

बटन अळिंबीचे उत्पादन

निखिल व अभिनव या दोघांनी उभारलेल्या प्रकल्पातून बटन अळिंबीचे उत्पादन घेतले जाते. एका बॅचकरिता तीस टन कंपोस्ट वापरले जाते. कंपोस्ट तयार करण्यापासून ७० ते ७५ दिवसांत अळिंबी तयार होण्याची प्रक्रिया होते. त्यामुळेच वर्षभर बॅचेस घेण्यावर भर राहतो. सोयाबीन, उसाचे चिपाड तसेच गव्हाचे कुटार कंपोस्टकामी वापरले जाते. अळिंबी उत्पादन घेण्याकरिता १६ खोल्या आहेत. त्यामध्ये रोटेशननुसार सरासरी दर चार दिवसांनी बॅच घेण्यावर भर राहतो. अळिंबी बियाणांची खरेदी दिल्ली येथून करून रेफर व्हॅनच्या माध्यमातून याचा पुरवठा संबंधित कंपनीद्वारे केला जातो.

महिन्याला ४५ टन उत्पादन

तीस टन कंपोस्टचा वापर केल्यास एका खोलीमधून सुमारे सहा टन अळिंबी उत्पादन घेणे शक्य होते. साधारण ८ खोल्यांमधून दर महिन्याला सरासरी ४० ते ४५ टनांची अळिंबी उत्पादन मिळते, असे निखिल यांनी सांगितले.

परराज्यात विक्री

स्थानिक स्तरावर आधी विक्री किती होते, याचा आढावा घेतला. परंतु उत्पादकता अधिक असल्याने नव्या बाजारपेठेचा शोध घेणे गरजेचे होते. त्यानुसार देशभरातील बाजारपेठांवर लक्षकेंद्रित केले. मुंबईतील दादर मार्केटमध्ये पहाटे साडेतीन वाजता व्यवहार सुरू होतात. तेथील काही व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. परंतु, तेथील व्यापाऱ्यांना त्याच परिसरातील उद्योजकांकडून अळिंबीचा पुरवठा होतो हे लक्षात आले. त्यामुळे छत्तीसगड, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांतील व्यावसायिकांशी संवाद साधला. त्याआधारे उत्पादित अळिंबीला बाजारपेठ मिळविण्यात यश मिळविले आहे.

असा होतो पुरवठा

अळिंबीचे एक पॅकेट २०० ग्रॅम वजनाचे असते. विक्रीसाठी साधारण दहा किलोचे बॉक्स पॅकिंग करून अळिंबीचा पुरवठा केला जातो. जेवढ्या अंतरावर पाठवायचे असेल, त्या प्रमाणात बर्फाची लादी त्या बॉक्‍समध्ये ठेवली जाते. यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. नागपूर हे भारताचे मध्य आहे. देशातील कोणत्याही राज्यात जाण्यासाठी येथून रेल्वेचा पर्याय आहे. याच माध्यमाचा अळिंबी वाहतुकीसाठी उपयोग केला आहे.

पुरवठा तत्त्वानुसार दरांमध्ये दररोज बदल होत राहतात. सुरुवातीला अळिंबी उत्पादकांची संख्या कमी होती. त्यामुळे चांगले दर मिळत होते. आता संख्या वाढल्याने स्पर्धाही वाढली. त्याचा परिणाम दरांवर झाला. तरी सुद्धा सरासरी १०० ते १२५ रुपये प्रति किलो इतका दर मिळतो, असे सांगतात.

कोविडमध्ये वाढल्या अडचणी

उद्योगाची सुरुवात २०२० मध्ये केली. या काळात देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी सुरुवातच अडचणीची ठरली. पहिल्याच टप्प्यात एक टन अळिंबी उत्पादन मिळाले होते. मात्र बाजारपेठ नसल्यामुळे काही प्रमाणात अळिंबी फेकून द्यावे लागली. अशी निराशाजनक सुरुवात होऊनही प्रयत्नात सातत्य राखल्याने आज चांगले उत्पन्न मिळत आहे.

निखिल निलावार, ९७६७८९८८९१